“शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा, राज्यभर प्रहारचं चक्काजाम आंदोलन

अमरावती – शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वात आज राज्यभर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. अमरावती, अचलपूर,नागपूर, लातूर, नांदेड, चांदूरबाजार आणि संभाजीनगर यांसह अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अमरावतीच्या परतवाडा रोडवर खुद्द बच्चू कडू रस्त्यावर उतरले. त्यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह रस्ता अडवून घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान काही ठिकाणी टायर पेटवण्यात आले, ज्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला. अचलपूर-परतवाडा मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
प्रत्येक ठिकाणी संभाव्य तणाव लक्षात घेता पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. अमरावतीत काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागण्याची शक्यता गृहीत धरून सुरक्षा दल सज्ज ठेवण्यात आले.
बच्चू कडू यांच्या या आंदोलनाला शेतकरी संघटनांसह महाविकास आघाडीतील अनेक आमदार, खासदार आणि मनसेचा पाठिंबा लाभला आहे. आंदोलनातील जोम पाहता सरकारवर दबाव आणण्याचा स्पष्ट संकेत मिळत आहे.