शहरात पाणीच पाणी; हवामान विभागाने जाहीर केला यलो अलर्ट
नागपूरमध्ये चौथ्या दिवशीही पावसाची मालिका कायम हवामान विभागाने शनिवारपासून ११ जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

नागपूर : उपराजधानीत पावसाची मालिका लागोपाठ चौथ्याही दिवशी कायम राहिली. गुरुवारी दुपारी तीन वाजता अर्धा तास दमदार सरी बरसल्या. त्यानंतर सायंकाळी विजा व मेघगर्जनेसह जवळपास दीड तास वादळी पावसाने झोडपले.
यामुळे नागपूरकरांची दाणादाण उडाली. प्रादेशिक हवामान विभागाचा शनिवारपासून अकराही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असल्याने पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. मॉन्सून सध्या मध्य भारतात सक्रीय असल्यामुळे त्याचा प्रभाव विदर्भासह शेजारी राज्यांमध्ये दिसत आहे.
विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये कुठे जोरदार, तर कुठे मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. गुरुवारीही तीनच्या सुमारास अर्धा-पाऊण तास वरुणकृपा झाली. काही काळ उसंत घेतल्यानंतर सायंकाळी सातच्या सुमारास पुन्हा दमदार पाऊस झाला. पावसापासून बचाव करण्यासाठी अनेकांना आडोशाचा आश्रय घ्यावा लागला.
विजांसह पावसाची दम’धार’
तर काहींना भिजतच घरचा रस्ता धरावा लागला. मनीष नगर नरेंद्रनगर पुलांसह शहरात जागोजागी खोलगट भागांमधे पाणी साचले होते. रस्त्यांवरही ठिकठिकाणी पाणीच पाणी दिसत होते
रात्रीपर्यंत रिपरिप सुरू होती. शहरात रात्री आठपर्यंत १७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. नागपुरात १ जूनपासून आतापर्यंत १४६ मिलीमीटर पाऊस झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. बळीराजाही सुखावला आहे.
शनिवारपासून जोर वाढणार
हवामान विभागाचा शनिवारपासून नागपूरसह विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट असल्यामुळे आगामी काळात पावसाचा जोर आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट असल्यामुळे मुसळधार पावसाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे