शिक्षकाचे विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे; शिक्षकावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळी टोला शाळेतील घटना

गोंदिया – गोंदिया जिल्ह्यातील सडक-अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहळीटोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्रजी शाळेत कार्यरत असलेल्या एका शिक्षकाने विद्यार्थिनींशी वारंवार अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. आरोपी शिक्षक शामराव रामाजी देशमुख, वय 53, रा. कोहमारा याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम 64(2), 65(2), 75(2), 181(1) तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) अंतर्गत कलम 4, 6, 12 व बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) अधिनियम 75 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर शिक्षकाने वर्ष 2023 पासून 2025 या कालावधीत शाळेतील विद्यार्थिनींसोबत अश्लील वर्तन केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणाची तक्रार चाइल्ड लाइन क्रमांक 1098 वर करण्यात आली होती. त्यानंतर बाल न्याय मंडळ आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला. चौकशीत आरोपीचे कृत्य स्पष्ट झाल्याने 18 जुलै रोजी डुग्गीपार पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. 21 जुलै रोजी आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाच्या तपास डोग्गीपार पोलीस करीत असून सध्या त्याचा मुक्काम भंडारा जिल्हा कारागृहात आहे.