“शिक्षकाला बनावट लिंक पाठवून 10 लाखांची सायबर फसवणूक, दोन आरोपी सायबर पोलिसांच्या ताब्यात”

नागपूर – नागपूरमध्ये 10 लाख रुपयांच्या मोठ्या सायबर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. जरीपटका परिसरात राहणाऱ्या एका शिक्षकास बनावट लिंक पाठवून आरोपींनी 10 लाख रुपये उकळले. फसवणुकीची जाणीव होताच संबंधित शिक्षकाने नागपूर सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
सायबर पोलीस निरीक्षक बळीराम सुतार यांनी 18 जुलै रोजी दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत माहिती दिली की, तांत्रिक तपासाच्या आधारे दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आनंद डढाडिया आणि रिजवान शेख अशी आहेत.
या आरोपींनी शिक्षकास एका फसव्या लिंकवर क्लिक करण्यास भाग पाडले आणि त्यानंतर त्यांच्या बँक खात्यातून संपूर्ण रक्कम काढून घेतली. सदर प्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.
सायबर पोलिसांची ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद आहे. मात्र नागरिकांनी अनोळखी लिंकवर क्लिक करताना किंवा कॉल्सना प्रतिसाद देताना अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.