“तू दहशतवादी आहेस” म्हणत अफगानी नागरिकावर जीवघेणा हल्ला; नागपुरात तिघे अटकेत

नागपूर शहरातील यशोधरा नगर परिसरात एका अफगानी नागरिकावर “तू दहशतवादी आहेस” असे म्हणत अमानुष मारहाण करण्यात आली. हल्लेखोरांनी त्याच्या डोक्यात आणि छातीत सीमेंटचा ब्लॉक फेकून जबरदस्त मारहाण केली. या प्रकरणी यशोधरा पोलीस स्टेशनमध्ये हत्या करण्याचा प्रयत्न (कलम 307) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.
जखमी व्यक्तीचे नाव फहीम मरझक (Faheem Marzhak) असून तो मागील सात वर्षांपासून भारतात, नागपुरात वास्तव्यास आहे. तो कपड्यांचे, गाद्यांचे व उशीच्या कव्हर्सचे विक्रीचे काम करतो.
मुख्य आरोपीचे नाव अजय चव्हाण असून त्याने फहीमला उद्देशून “तू आतंकवादी आहेस” असे म्हणत त्याच्या चारचाकी वाहनाची तोडफोड केली. त्यानंतर त्यालागाडीतून खेचून बाहेर काढत बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली.
घटनेची माहिती मिळताच यशोधरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फहीमला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलेपोलिसांनी अजय चव्हाणसह इतर दोन साथीदारांना अटक केली असून हल्ल्यामागील खरे कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस करीत आहेत.