ट्रॅफिक चेकिंग दरम्यान गोंधळ:बिना नंबर प्लेटच्या गाडीला थांबवलं म्हणून पोलिसांशी वाद, महिला PSI यांनी स्वतः दिली तक्रार

नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाणे क्षेत्रात ट्रॅफिक तपासणीदरम्यान मोठा गोंधळ झाला. नंबर प्लेट नसलेल्या गाडीला थांबवले असता वाहनचालकाने ट्रॅफिक पोलिसांशी गैरवर्तन करत धमक्या दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात एका महिला पोलिस उपनिरीक्षकांनी स्वतः तक्रार नोंदवली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जरीपटका परिसरात ट्रॅफिक पोलिसांकडून दररोजप्रमाणे वाहनांची तपासणी सुरू होती. त्याच दरम्यान एक गाडी ज्यावर नंबर प्लेट नव्हती, तिला थांबवण्यात आले. मात्र, गाडी थांबवल्यामुळे चालक भडकला आणि त्याने आधी पोलिसांशी उद्धटपणे वागणूक दिली. त्यानंतर त्याने आपल्या भावाला बोलावून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, आरोपीचा भाऊ घटनास्थळी आल्यानंतर पोलिसांना उलट विचारतो, “तुमचं कोण, माझ्या भावाची गाडी थांबवायला?”
गाडीवर नंबर प्लेट नव्हती, चालकाकडे परवाना देखील नव्हता आणि तरीही पोलिसांना धमक्या देण्यात आल्या. या प्रकरणी संबंधित महिला PSI यांनी स्वतः पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, हा वाद आता थेट पोलिस ठाण्यात पोहोचला आहे.