उपराजधानी नागपूर रक्ताने न्हाली! एकाच रात्री तीन हत्या; गुन्हेगार बिनधास्त, पोलिसांची भीतीच संपली!

नागपूर :- “शांततेचं शहर” म्हणून ओळखलं जाणारं उपराजधानी नागपूर रविवारी रात्री रक्ताने न्हालं. अवघ्या काही तासांच्या अंतराने शहरात तीन वेगवेगळ्या खूनाच्या घटना घडल्याने संपूर्ण शहर हादरून गेलं आहे. या घटनांनी नागपूरच्या कायदा-सुव्यवस्थेवर गडद सावली पडली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.
ही तीनही खूनाच्या घटना शहरातील वेगवेगळ्या भागात – गणेशपेठ, लाकडंगज आणि सदर परिसरात घडल्या असून, विशेष म्हणजे या हत्या केवळ काही तासांच्या अंतरावर घडल्या. त्यामुळे हे फक्त योगायोग आहेत की कुठल्या टोळीतील अंतर्गत वादाचा परिणाम, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.
पोलिसांकडून सतत “गुन्हेगारांवर वचक” असल्याचे दावे केले जात होते. मात्र एकाच रात्री तीन हत्या घडल्याने या दाव्यांची पोलखोल झाली आहे.
प्रत्येक घटनेत पोलिसांनी स्वतंत्र तपास सुरू केला आहे. मात्र गुन्हेगार अद्याप मोकाट असून, या घटनांनी नागपूरमधील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांना अधोरेखित केलं आहे.