वाठोडा हत्या प्रकरणाचा उलगडा — लुटीच्या उद्देशाने युवकाची निर्घृण हत्या, तिन आरोपी गजाआड

नागपूर – वाठोडा परिसरात लुटीच्या उद्देशाने करण्यात आलेल्या एका खुनाच्या प्रकरणाचा उलगडा करण्यात आला असून, क्राईम ब्रँच युनिट-४ ने तिघा आरोपींना अटक केली आहे. मृतकाचे नाव लक्ष्मण मुडे (वय ४८), रा. भारतवाडा जुनी वस्ती असे आहे.
घटनेच्या प्राथमिक तपासात असे समोर आले की आरोपींनी लक्ष्मण मुडे यांना लुटण्याचा प्रयत्न केला. प्रतिकार केल्याने त्यांच्यावर हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना घडल्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
घटनेनंतर वाठोडा पोलिसांनी तपास सुरू केला. तांत्रिक पुरावे व सुगम मार्गांनी आरोपींचा शोध घेण्यात आला. याच दरम्यान, पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेतले. क्राईम ब्रँच युनिट-४ चे पीआय कमलाकर गड्डीमे, हेडकॉन्स्टेबल रोशन तिवारी, अतुल चाटे, देवेंद्र आणि पुरुषोत्तम यांनी ही धडक कारवाई केली. अटकेनंतर आरोपींना पुढील तपासासाठी वाठोडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की आरोपींची चौकशी सुरू असून, हत्येची कारणे व अन्य तथ्ये पुढे येत आहेत. आरोपींच्या अटकेनंतर परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला आहे.
पुढील तपास वाठोडा पोलीस करीत आहेत.