वाठोडा परिसरात चौकीदाराची निर्घृण हत्या; दोन नाबालिगांसह एका आरोपीचा शोध सुरु

नागपूर (वाठोडा) – शहरातील वाठोडा परिसरात असलेल्या एसपी पेट्रोल पंपाजवळील एका कन्स्ट्रक्शन साईटवर चौकीदाराची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चोरीच्या उद्देशाने घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या हत्येमध्ये दोन नाबालिग आणि एक बालक सामील असल्याचे उघड झाले असून, त्यांनी चोरीसाठी ही खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आरोपींनी चौकीदारावर रात्रीच्या सुमारास हल्ला केला. गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या चौकीदाराचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
वाठोडा पोलिसांनी घटनेनंतर तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून, गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुरावे गोळा करून आरोपींचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
ही घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, बांधकाम साईटवरील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी लवकरच आरोपींना ताब्यात घेण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.