तीनशे रुपयांसाठी मित्रानेच मित्राचा घेतला जीव; आरोपीवर ५५ हून अधिक गुन्हे दाखल

नागपूर :नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत थरारक घटना उघडकीस आली आहे. केवळ तीनशे रुपयांच्या वादातून एका मित्राने आपल्या मित्राला मृत्यूच्या दारी ढकलले. आरोपीचे नाव सुमित उर्फ भोला रमेश वाघमारे (वय २७, रा. हिवरीनगर, जयभीम चौक, नाकोडे बिल्डिंगसमोर, नागपूर) असे असून, तो पोलिसांच्या रडारवर आधीपासूनच कुप्रसिद्ध गुन्हेगार म्हणून ओळखला जातो.
आरोपी सुमित वाघमारेवर यापूर्वीच एकूण ५५ गुन्हे दाखल आहेत. यात जबरी चोरी, खून, गैरकायद्याची मंडळी जमवून दहशत माजवणे, अश्लील शिवीगाळ, धमकी देणे, सामान्य लोकांना त्रास देणे, तसेच जीव घेण्याच्या धमक्या देणे अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या मित्रासोबत किरकोळ पैशाच्या वादातून भांडण करून त्याला मृत्यूच्या दारी ढकलले. अनेकदा प्रतिबंधक कारवाई करूनही आरोपीच्या वर्तणुकीत सुधारणा झाली नाही.
याप्रकरणी कलम ५६(१)(अ)(ब) महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली असून, पुढील दोन वर्षांसाठी त्याला नागपूर शहर व जिल्ह्याच्या हद्दीतून हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान, आरोपीला भंडारा येथे त्याच्या नातेवाईकांकडे सोडण्यात आले आहे.


