अंबाझरी गार्डन पुन्हा नागपूर मनपाच्या ताब्यात; पालकमंत्री बावनकुळे यांचे आदेश – लवकरच नागपूरकरांसाठी होणार खुले

नागपूर : नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी! शहरातील चर्चित अंबाझरी गार्डन आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या (एमटीडीसी) ताब्यातून बाहेर पडून पुन्हा एकदा नागपूर महानगरपालिकेकडे (मनपा) येणार आहे. पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांना तातडीने गार्डनचा कार्यभार घेऊन ते नागरिकांसाठी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
सोमवारी जिल्हा नियोजन भवनात झालेल्या बैठकीत शहर व ग्रामीण भागातील विविध प्रश्नांवर चर्चा झाली. त्यावेळी अंबाझरी गार्डनचे पुनरुज्जीवन व देखभाल या विषयावरही विचारविनिमय झाला.
सध्या या गार्डनचे नियंत्रण एमटीडीसीकडे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गार्डन सुरू करण्याचे प्रयत्न होत होते, मात्र विविध कारणांमुळे योजना अडकल्या होत्या. यापूर्वी एमटीडीसीने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (PPP) पद्धतीने एका खाजगी कंपनीसोबत करार केला होता, पण नागरिकांचा विरोध आणि वादामुळे तो करार रद्द करण्यात आला.
आता गार्डनचा ताबा मनपाकडे आल्याने ते नव्या रूपात सजवून नागपूरकरांसाठी आधुनिक सोयीसुविधांसह खुले होईल, अशी अपेक्षा आहे.

