भारतीयांच्या नेतृत्वाखालीच उभे राहू शकते मनुष्याच्या जीवनाचे उन्नत स्वरूप

नागपूर : जगात परिवर्तन येत आहे असे विचारवंत म्हणतात. या बदलत्या काळात माणसाने योग्य दिशा धरली नाही तर तो विनाशाचा काळ ठरू शकतो. मात्र काळ ओळखून नीट पावले योग्य दिशेने टाकली तर मनुष्याच्या जीवनाचे नवीन उन्नत स्वरुप उभे राहते. जगात असे स्वरुप भारतीयांच्या नेतृत्वाखालीच उभे राहू शकते, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. नागपुरातील दिनदयाल नगरातील पांडुरंगेश्वर शिवमंदिरात श्रावणमासानिमित्त त्यांच्या हस्ते अभिषेक व पूजन झाले. त्यावेळी ते बोलत होते.
इतके वर्ष कष्ट केले आता बरे दिवस आले आहेत, आता आम्हाला काही मिळू द्या, असे अनेकांना वाटते. मात्र आम्हाला काही मिळावे हा शिवाचा स्वभाव नाही. केवळ ज्यापासून धोका आहे व जगात जे काही हालाहल आहे तेच आम्ही अंगावर घेतो, अशा वृत्तीतून जीवन जगण्याची खूप आवश्यकता आहे. जगाच्या सगळ्या समस्यांमागे मनुष्याचा हावरटपणा व कट्टरता आहे. कट्टरतेतून राग-द्वेष निर्माण होतात व त्यातून युद्ध होतात. मलाच पाहिजे ही स्वार्थाची वृत्ती आणि भेदभाव या मनुष्याच्या प्रवृत्तीच्या काळी बाजू आहेत. ही प्रवृत्ती बदलली पाहिजे. हीच प्रवृत्ती बदलणे म्हणजे शिवाचे पूजन करणे होय, असे त्यांनी प्रतिपादन केले. परस्परविरोधी बाबींची सांगड घालून नवनीत कसे काढायचे हे परंपरेने आपल्याला ठावूक आहे. त्यामुळे ती परंपरा पुढे नेणाऱ्या पूजा, यात्रा यामागील भाव ओळखून कार्य केले व संस्कार आपल्या अंगी बाळगला तर देव प्रसन्न होईलच. जगाला दिलासा देण्याची ताकद आपल्यातच आहे, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला.यावेळी त्यांच्या हस्ते आरतीदेखील झाली. मंचावर महानगर संघचालक राजेशजी लोया, दिनदयाल नगर समुत्कर्ष संस्थेचे अध्यक्ष दिलीपजी कटारकर प्रामुख्याने उपस्थित होते.