चार्जशीट कमजोर करण्यासाठी मागितली २ लाखांची लाच – PSI आणि रायटरविरोधात ACB ची कारवाई

नागपूर:
नागपूर शहरात पुन्हा एकदा लाचखोरीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेतील सहाय्यक पोलीस निरीक्षक (PSI) गणेश राऊत आणि त्यांचे रायटर हेड कॉन्स्टेबल चंद्रशेखर घागरे यांच्याविरोधात एंटी करप्शन ब्युरोने (ACB) लाच मागणीचा गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही एका जमीन प्रकरणाशी संबंधित चार्जशीट कमकुवत करण्याच्या बदल्यात तक्रारदाराकडे दोन लाख रुपयांची लाच मागत असल्याचा आरोप आहे.
प्राप्त माहितीनुसार, तक्रारदार व्यक्तीविरोधात वाठोडा पोलीस ठाण्यात जमीन वादाच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्यामुळे त्यांना तुरुंगवास सुद्धा भोगावा लागला होता. या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचमधील PSI गणेश राऊत आणि रायटर घागरे करत होते.
तक्रारदाराकडून PSI राऊत आणि रायटर घागरे यांनी सुरुवातीला १ लाख रुपयांची मागणी केली होती. यानंतर ४ ऑगस्ट रोजी एसीबीच्या पथकाने सापळा रचला. मात्र, सापळ्याची कल्पना लागल्याने आरोपींनी पैसे स्वीकारण्यास नकार दिला. तरीदेखील लाच मागण्याचा ठोस पुरावा मिळाल्यामुळे ACB ने सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सध्या या दोघांना ACB ने नोटीस बजावून शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे. त्याचबरोबर त्यांच्या घरांची झडती देखील सुरू आहे. या कारवाईमुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.