देशभक्तीच्या रंगात रंगला नागपूर; ‘हर घर तिरंगा’ मोहिम अंतर्गत तिरंगा बाइक रॅलीचे भव्य आयोजन

नागपूर : – ‘हर घर तिरंगा – घरोघरी तिरंगा’ या राष्ट्रप्रेम जागवणाऱ्या मोहिमेअंतर्गत नागपुरात भव्य तिरंगा बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाला समर्पित असलेल्या या उपक्रमाने संपूर्ण शहरात देशभक्तीचा जागर केला.
ही रॅली ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयातून (सिव्हिल लाईन्स) प्रारंभ झाली. मनपाचे अधिकारी, कर्मचारी, विविध सामाजिक संस्था, नागरिक आणि विशेषतः युवकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत देशप्रेमाचा संदेश दिला.
बाईकवर तिरंगा फडकावत सहभागी युवकांनी नागपूरच्या रस्त्यांवरून राष्ट्रप्रेमाचा जयघोष केला. त्यांनी नागपूरकरांना १५ ऑगस्टपर्यंत आपल्या घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहनही यावेळी केले.
या रॅलीचा उद्देश केवळ झेंडा फडकवण्यापुरता मर्यादित नव्हता, तर घरोघरी देशभक्ती पोहचवण्याचा होता. नागपूर मनपाच्या या उपक्रमामुळे स्वातंत्र्य दिन एक लोकआंदोलनाचा भाग ठरत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून आले.
शहरातील विविध ठिकाणी “वंदे मातरम्”, “भारत माता की जय” अशा घोषणांनी वातावरण भारावून गेले होते. तिरंग्यांच्या लाटांमध्ये न्हालेल्या या रॅलीने नागपूर शहर पुन्हा एकदा देशभक्तीने नटलेले दिसले.