गडचिरोलीत भीषण अपघात, मॉर्निंग वॉक करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांवर ट्रक चढला; चौघांचा मृत्यू, दोघांची प्रकृती चिंताजनक

गडचिरोली : – गडचिरोली जिल्ह्यातील काटली गावाजवळ आज पहाटेच्या सुमारास घडलेल्या भीषण अपघातात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या सहा विद्यार्थ्यांना ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित दोघांची प्रकृती अत्यवस्थ असून, त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना सकाळी सुमारे ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास घडली. काटली येथील सहा विद्यार्थी नियमित व्यायामासाठी रस्त्यावर चालत असताना भरधाव ट्रक त्यांच्या अंगावर चढला. अपघातानंतर ट्रक चालक ट्रकसह पळून गेला. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
अपघातानंतर संतप्त गावकऱ्यांनी रस्त्यावर उतरून तीव्र चक्काजाम आंदोलन केले. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, त्यांनी गर्दी नियंत्रणात घेत तपास सुरु केला आहे. ट्रकचा व चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, परिसरातील येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.
गंभीर जखमी विद्यार्थ्यांवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले असून, आवश्यक असल्यास पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर हलविण्याची तयारी आरोग्य यंत्रणेकडून केली जात आहे.
दरम्यान, नागरिकांनी सुसाट वेगाने वाहने चालवणारे चालक व मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या अपघाताने जिल्ह्यात शोककळा पसरली असून, विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
पुढील तपास पोलीस करीत आहेत.