हिंगणा टी पॉइंटवर उभाठाचे आंदोलन,‘कलंकित मंत्र्यांना पदावरून निलंबित करा

नागपूर – राज्यातील कलंकित मंत्र्यांना तात्काळ पदावरून पायउतार करण्याच्या मागणीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज नागपूरच्या हिंगणा टी पॉइंट परिसरात जोरदार आंदोलन करण्यात आले.
पक्षाने राज्यातील मंत्री संजय शिरसाट, संजय गायकवाड, योगेश कदम आणि माणिकराव कोकाटे यांच्यावर गेल्या काही दिवसांत घडलेल्या घटनांचा उल्लेख करून गंभीर आरोप केले. “गुन्ह्यांच्या सावटाखाली मंत्रीपद भूषवणे हा लोकशाहीचा अपमान आहे”, असा दावा करत या मंत्र्यांना पदावर राहण्याचा कोणताही नैतिक किंवा कायदेशीर अधिकार नाही, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली.
घटनास्थळी वाडी पोलिसांनी तात्काळ पोहोचून आंदोलकांना निवेदन देण्याची विनंती केली. पोलिसांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन स्वीकारताच मार्ग पुन्हा सुरळीत करण्यात आला.
आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी “कलंकित मंत्र्यांचा निषेध असो”, “जनतेचा विश्वासघात करणाऱ्यांना जागा नाही” अशा घोषणा देत संताप व्यक्त केला. या कारवाईत वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते, मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने परिस्थिती नियंत्रणात आली.
आंदोलनादरम्यान शिवसेना आणि युवासेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. घोषणाबाजी करत नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 काही काळ रोखण्यात आला. या अचानक झालेल्या मार्ग अडवण्यामुळे वाहनचालकांना काही काळ गैरसोय सहन करावी लागली.




