जरीपटका भीम चौकात अपघात:स्कूटीस्वार वृद्धाला अज्ञात वाहनाची धडक, मदतीअभावी मृत्यू

नागपूर – जरीपटका भीम चौक येथे एका अज्ञात वाहनाने स्कूटीवरून जाणाऱ्या वयोवृद्ध इसमाला जोरदार धडक दिली आणि संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. या अपघातात वृद्ध इसम गंभीर जखमी झाले होते.
अपघातानंतर बराच वेळ ते रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमूनही कोणी मदतीस धावले नाही. पोलिसी कारवाईच्या भीतीने कोणीही त्यांना उचलण्याचे धाडस दाखवले नाही.
अखेर राष्ट्रीय बजरंग दलाचे कार्यकर्ते पुढे सरसावले आणि त्यांनी एका ऑटोच्या मदतीने वृद्धास रुग्णालयात पोहोचवले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.मृत इसमाचे नाव दयालदास दिवानचंद धनराजानी (राहिवासी – जरीपटका) असे असून, ही घटना केवळ अपघात नसून माणुसकीला काळिमा फासणारी म्हणून पाहिली जात आहे.
दरम्यान, अपघात घडवणारा वाहनचालक अजूनही फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.