खैरी-बिजेवाडा प्रकरण: दोन बालकांचा मृत्यू, पालकांचा प्रशासनावर गंभीर आरोप; आरोपीस राजकीय पाठबळाचा संशय

रामटेक (नागपूर जिल्हा):खैरी-बिजेवाडा ग्रामपंचायत हद्दीत २६ जुलै रोजी पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून दोन बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर मृतकांच्या पालकांनी प्रशासनावर गंभीर आरोप करत निष्क्रियतेचा ठपका ठेवला आहे. तसेच, आरोपीस राजकीय वरदहस्त असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रकरणात अजूनही ठोस कारवाई न झाल्यामुळे पीडित कुटुंबांमध्ये संतापाची लाट आहे. “प्रशासन कोणाच्या तरी दबावाखाली आहे. जर एखाद्या सामान्य नागरिकाने चूक केली असती तर लगेच कारवाई झाली असती,” असा आक्रोश मृतकांच्या वडिलांनी केला.
पोलीस प्रशासन मौन, तर वरिष्ठ अधिकारी प्रकरण झटकताना दिसले
रामटेकचे पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश बरकतें आणि रामटेकचे ठाणेदार रवींद्र मानकर यांनी या प्रकरणावर भाष्य करण्यास स्पष्ट नकार दिला.
दरम्यान, नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. हर्ष पोतदार यांनी हे प्रकरण राजस्व विभागाच्या अखत्यारीत येते, असे सांगत पोलीस कारवाईपासून हात झटकले.
“चौकशी सुरु आहे” – SDO रामटेक
या प्रकरणात रामटेकचे उपविभागीय अधिकारी प्रियेश महाजन यांनी सांगितले की, “तहसीलदार रमेश कोडपे यांना चौकशीचे आदेश दिले असून, चौकशी अहवालाची प्रतीक्षा आहे.”