महाराष्ट्रमहाराष्ट्र ग्रामीण

कोराडीमध्ये पोलिसावर जीवघेणा हल्ला – गाडी चढवून ठार मारण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत

नागपूर : नागपूर शहरातील कोराडी पोलीस ठाणे हद्दीत ड्युटीवर असलेल्या पोलिसावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कुख्यात गुन्हेगाराच्या मुलाने पोलिसाला गाडी चढवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात पोलिस गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आरोपी युवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

 

घटनेची सविस्तर माहिती अशी की, दिनांक 23 ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कोराडी नाका ते नागपूर या मार्गावर फिक्स प्वॉईंट ड्युटी सुरू होती. सहाय्यक फौजदार सुधाकर पटमासे व त्यांचा स्टाफ यांना गुप्त माहिती मिळाली होती की, एक संशयित वाहन या परिसरातून जाणार आहे. त्यानुसार संशयित गाडी दिसताच पोलिसांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला.

मात्र गाडी चालवणारा 19 वर्षीय रेहान अशफाक शेख (रहिवासी – नागपूर) याने गाडी न थांबवता थेट पोलिसांवर चढवली. या धडकेत सुधाकर पटमासे गंभीर जखमी झाले व त्यांचा खांदा फ्रॅक्चर झाला. घटनेनंतर आरोपी गाडी घेऊन पसार झाला. गाडीत आरोपीसोबत आणखी एक युवक असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

दरम्यान, पोलिसांनी तात्काळ सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्यावर सरकारी कामात अडथळा आणणे आणि खूनाचा प्रयत्न या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपीचा पिता हा सीताबर्डी परिसरातील कुख्यात गुन्हेगार असून त्याच्यावर खून व गांजा तस्करीचे गंभीर गुन्हे नोंदलेले आहेत.

 

सध्या कोराडी पोलीस पुढील तपास करीत असून या घटनेमुळे पोलीस दलात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button