लग्नाचे आमिष दाखवून बॉसकडून तरुणीवर अत्याचार; पंचपावली पोलिसांची तत्काळ कारवाई, आरोपी अटकेत

नागपूर :
पंचपावली परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दुकानात काम करणाऱ्या 23 वर्षीय तरुणीवर तिच्या बॉसने लग्नाचे आमिष दाखवून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. मात्र, लग्नाबाबत टोलवाटोलवी सुरू केल्याने पीडितेने थेट पोलिस ठाण्यात धाव घेतली. तक्रार दाखल होताच पंचपावली पोलिसांनी आरोपीस अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता पंचपावली परिसरातील रहिवासी असून ती गेल्या सात महिन्यांपासून पाळीव कुत्र्यांची खरेदी-विक्री व खाद्यपदार्थांचा व्यवसाय करणाऱ्या दुकानात काम करत होती. या दुकानाचा मालक हर्षल सुभाषराव दहीकर (वय 30, रा. खरबी चौक) असा अटकेत असलेल्या आरोपीचे नाव आहे.
तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने पीडितेला लग्नाचे आश्वासन देत तिच्यासोबत वारंवार जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, जेव्हा तरुणीने लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा आरोपीने टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. त्याचा स्वभाव बदलल्याचे लक्षात आल्यानंतर पीडिता मानसिकदृष्ट्या खचली आणि शेवटी धाडस करून तिने पोलिसांत तक्रार नोंदवली.
तक्रार मिळताच पंचपावली पोलिसांनी तत्काळ कारवाई करून आरोपीस अटक केली आहे. पुढील चौकशी सुरू असून या प्रकरणामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.




