महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाची जनसुनावणी ७ ऑगस्ट रोजी नागपुरात, नियोजन भवनात होणार आयोजन,आयोगाचे अध्यक्ष श्री. प्यारे खान यांच्या अध्यक्षतेखाली प्रकरणांचा निपटारा

महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाची जनसुनावणी उपराजधानी नागपूर येथे होणार आहे. ही सुनावणी गुरुवार, ७ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता नागपूरच्या नियोजन भवनात आयोजित करण्यात आली आहे. आयोगाचे माननीय अध्यक्ष (मंत्री दर्जा) श्री. प्यारे खान यांच्या अध्यक्षतेखाली प्रलंबित प्रकरणांवर तात्काळ कारवाई करण्यात येईल.
मागील काही महिन्यांमध्ये आयोगाकडे मिळालेल्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. विशेषतः नागपूर आणि संपूर्ण विदर्भ भागातून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींचा निपटारा मुंबईतील आयोगाच्या मुख्य कार्यालयात केला जातो. मात्र, तक्रारदारांना मुंबईला येणे आर्थिक व भौगोलिक दृष्टिकोनातून कठीण ठरत होते. नागपूरमध्ये जनसुनावणी घेण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात येत होती. या मागण्यांची दखल घेत श्री. प्यारे खान यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून नागपूरमध्ये ही सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
ही सुनावणी ७ ऑगस्ट, गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता नागपूरच्या सदर परिसरातील नियोजन भवनात पार पडणार आहे. आयोगाच्यावतीने स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या आहेत की, ज्यांनी आयोगात तक्रारी दाखल केल्या आहेत त्यांनी आपले आवश्यक कागदपत्रे व पुरावे घेऊन नियोजन भवनात वेळेवर उपस्थित राहावे. तसेच ज्या व्यक्तींच्या नव्या तक्रारी व निवेदने असतील, तीही यावेळी स्वीकारण्यात येतील. सुनावणीदरम्यान दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकून घेतल्या जातील.
श्री. प्यारे खान यांनी सांगितले की, “अल्पसंख्याक समाजाला न्याय मिळवून देणे ही आमची प्राथमिकता आहे. त्यासाठी कुठलाही आर्थिक अथवा भौगोलिक अडथळा येऊ नये, म्हणूनच नागपूरमध्ये ही जनसुनावणी आयोजित करण्यात आली आहे.” त्यांनी खात्री दिली की आयोग पारदर्शक पद्धतीने काम करेल आणि प्रत्येक तक्रारीचा निष्पक्ष निपटारा केला जाईल