मनपा आयुक्तांनी केली खापरी बस डेपो परिसराची पाहणी, परिसराचा विकास करण्याचे दिले निर्देश

नागपूर : नागपूर महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी बुधवारी आपली बसच्या खापरी बस डेपो परिसराची पाहणी केली. याप्रसंगी मनपाचे अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, मनपाचे उपायुक्त श्री मिलिंद मेश्राम, परिवहन व्यवस्थापक तथा उपायुक्त श्री. राजेश भगत, परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. योगेश लुंगे, कार्यकारी अभियंता श्री. अजय पजारे, उपअभियंता श्री. केदार मिश्रा यांच्या सह इतर अधिकारी कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.
खापरी बस डेपो येथे जेबीएम व इका पीएम बसेस करिता चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी डेपो परिसरातील जागेचा विकास करण्याचे निर्देश दिले. खापरी बस डेपो येथे येणाऱ्या बसेस करिता आगमन व प्रस्थानाची ठिकाण निश्चित करावे. परिसरात विद्युत व प्रकाश व्यवस्था करावी, जागा समतल करून घ्यावी, आवश्यकतेनुसार मनुष्यबळाची नेमणूक करावी, संपूर्ण परिसर स्वच्छ करून घ्यावा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ठेवावी, लवकरात लवकर कामाला सुरुवात करावी, असे निर्देश आयुक्त तथा प्रशासक डॉ.अभिजीत चौधरी यांनी परिवहन विभागाला दिले. याशिवाय मनपा आयुक्त डॉ चौधरी यांनी खापरी मेट्रो स्टेशन परिसर व हिंगणा रोड येथील हिंगणा बस डेपोला भेट दिली.



