मनपा कर्मचाऱ्याची आत्महत्या; “अधिकाऱ्यांच्या त्रासामुळे” मृत्यू?

नागपूर :
आशी नगर झोनमधील महापालिकेचे सफाई कर्मचारी राजू उपाध्याय (वय ५७) यांनी अधिकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून बुधवारी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण झोनमध्ये खळबळ उडाली आहे.
राजू उपाध्याय यांनी लिहिलेल्या सुसाइड नोटमध्ये काही अधिकाऱ्यांकडून टार्गेट करण्यात येत असल्याचे आणि त्यांच्या खांद्यावर जास्त जबाबदाऱ्या टाकण्यात आल्याचे स्पष्ट नमूद आहे.
गुरुवारी सकाळी मृतकाचे नातेवाईक आणि परिसरातील नागरिक मृतदेह घेऊन आशी नगर झोन कार्यालयासमोर पोहोचले. “राजू उपाध्यायला न्याय मिळाला पाहिजे”, “दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा” अशा घोषणा देत संतप्त निदर्शने केली.
या प्रकरणात झोनच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “पोलिस तपास सुरू असून, चौकशीतून जे निष्पन्न होईल त्यानुसार पुढील कारवाई केली जाईल.”
ही घटना मनपा कर्मचारी वर्गावरील मानसिक दबाव व कार्यभाराच्या भीषण परिस्थितीवर प्रकाश टाकते. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.