मनपा निवडणुकीआधी भाजपची जंबो कार्यकारिणी जाहीर

नागपूर : आगामी नागपूर महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने आपली संघटनात्मक ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर पक्षाची नवी जंबो कार्यकारिणी जाहीर केली.
तिवारींनी घोषित केलेल्या या कार्यकारिणीत चार महामंत्री, तर १६ उपाध्यक्ष आणि १६ मंत्री अशी मोठी फळी तयार करण्यात आली आहे. या माध्यमातून पक्षातील सर्व गट-तट सांभाळत संघटनाची बांधणी केल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
युवा मोर्चा वगळता इतर सर्व मोर्चांच्या अध्यक्षांची नावे देखील तिवारींनी जाहीर केली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीसाठी भाजपने आपले सर्व फ्रंट सज्ज केले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून नागपूर महानगर पालिका निवडणुकीसंदर्भात राजकीय वातावरण तापले असून, भाजपकडून जाहीर झालेली ही मोठी कार्यकारिणी ही पक्षाच्या रणनीतीचा महत्त्वाचा भाग मानली जात आहे. संघटनाच्या या नव्या रचनेमुळे भाजप शहरातील निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरल्याचे संकेत मिळाले आहेत.



