मनपाची अवैध फलकांवर धडक मोहीम – २० हजारांहून अधिक फलक हटवले, लाखोंचा दंड वसूल

नागपूर शहरातील रस्त्यांवर आणि सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीररित्या लावण्यात आलेल्या फलक, होर्डिंग्ज आणि बॅनर्सवर अखेर नागपूर महानगरपालिकेने कठोर पावले उचलली आहेत. जुलै २०२५ अखेरपर्यंत महापालिकेने एकूण २०,२८९ अवैध फलक, बॅनर्स आणि होर्डिंग्ज हटवले असून, या कारवाईत १ लाख ७५ हजार रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
महापालिकेने ही माहिती नागपूर खंडपीठात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे दिली. यामध्ये स्पष्ट करण्यात आले की, नागरिकांनी जर ‘नागपूर लाईव्ह’ अॅप किंवा महापालिकेच्या अधिकृत पोर्टलवर तक्रार केली, तर त्यावर तात्काळ कारवाई केली जाते.
या मोहीमेदरम्यान २६५ प्रकरणांमध्ये संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील फलक माफियांना धडा शिकवण्याचा प्रयत्न महापालिकेने सुरू केला आहे.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते दिनेश नायडू यांनी महापालिकेवर न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप करत अवमान याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी १४ ऑगस्ट २०२५ रोजी न्यायमूर्ती अनिल किलोर आणि वृषाली जोशी यांच्या खंडपीठासमोर होणार आहे.