मनपाच्या विद्यार्थिनींनी सैनिकांना बांधली राखी:‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध उपक्रम

नागपूर : केंद्र शासनाच्या ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थिनींनी एक अनोखा उपक्रम राबवला. या विद्यार्थिनींनी आपल्या देशाच्या वीर सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना स्वतःच्या हाताने बनवलेल्या राख्या बांधल्या. या उपक्रमामुळे ‘हर घर तिरंगा’ सोबतच ‘हर मन तिरंगा’ ही भावनाही अधिक दृढ झाली.
मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या व अतिरिक्त आयुक्त श्री. अजय चारठणकर मार्गदर्शनात मनपाद्वारे हर घर तिरंगा अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुसार गुरुवारी (ता.७) मनपाच्या जयताळा माध्यमिक शाळा, संजयनगर माध्यमिक शाळा, प्रियदर्शनी उच्च प्राथमिक शाळा आणि नेताजी मार्केट माध्यमिक शाळा विद्यार्थिनींनी सीताबर्डी किल्ला स्थित ‘उत्तर महाराष्ट्र आणि गुजरात उपक्षेत्र (उमंग)’ च्या जवानांना राखी बांधत देशभक्ती आणि आपल्या सैनिकांप्रती असलेला आदर व्यक्त केला. विशेष म्हणजे, या राखी मनपाच्या विद्यार्थिनींनी स्वतः तयार केल्या. याप्रसंगी कर्नल श्री. आर. के. तिवारी, कर्नल श्री. रविकांत यांच्यासह मनपाच्या शिक्षणाधिकारी श्रीमती साधना सयाम, मनपाचे क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, सहायक शिक्षणाधिकारी श्री. सुभाष उपासे, क्रीडा निरीक्षक उज्वला चरडे, शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक, मनपाचे कर्मचारी उपस्थित होते.
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध उपक्रम देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांना रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्या परिवारापासून दूर असल्याचा एकटेपणा जाणवू नये. या राख्यांच्या माध्यमातून विद्यार्थिनींनी सैनिकांना आपले भाऊ मानून त्यांच्यासाठी प्रेम आणि आदराचा संदेश देण्यात आला या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये देशभक्ती, सामाजिक जाणीव आणि सैनिकांच्या त्यागाबद्दल कृतज्ञता निर्माण करणारा होता.