मुलाला कंबरेला बांधून महिलेची कालव्यात उडी; आत्महत्येचे गूढ कायम

रामटेक तालुक्यातील पटगोवारी गावात मंगळवारी (१२ ऑगस्ट) दुपारी एक हृदयद्रावक घटना घडली. पेंच जलाशयाच्या डाव्या कालव्यात एका २८ वर्षीय महिलेनं आपल्या पाच वर्षीय मुलाला कंबरेला बांधून पाण्यात उडी घेतली. पाण्याचा तीव्र प्रवाह असल्याने दोघेही वाहून गेले.
मृत महिलेचे नाव अल्का शेखर बेहूणे (वय २८) तर मुलाचे नाव अरमान (वय ५) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, अल्काने मुलाला कंबरेला बांधून पाण्यात उडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. घटनेच्या वेळी कालवा पूर्ण क्षमतेने वाहत होता.
घटनास्थळी पारशिवनी पोलिस, गजानन गंगाधर राजशेंडे, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह बचाव पथकाने शोधमोहीम सुरू केली. मात्र, मंगळवार संध्याकाळपर्यंत आई-मुलाचे मृतदेह सापडले नाहीत. पोलिसांनी मृतदेह मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, ती आत्महत्या आहे की अपघात, याबाबत तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



