नागपूर पोलिसांचा एआई आधारित नवा उपक्रम : “ऑपरेशन शक्ती” अंतर्गत एआय टूल्सची सुरुवात

नागपूर : नागपूर पोलिसांनी मानवी तस्करीविरोधातील लढा अधिक सक्षम करण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आधार घेत नवा उपक्रम हाती घेतला आहे. “ऑपरेशन शक्ती” अंतर्गत पोलिसांनी दोन महत्त्वपूर्ण एआय (Artificial Intelligence) आधारित साधनांची सुरुवात केली असून, त्यात “गरुड दृष्टि” आणि फेशियल रिकग्निशन सर्व्हिलन्स सिस्टमचा समावेश आहे.
अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गरुड दृष्टि हे एआय सॉफ्टवेअर अलीकडेच मुख्यमंत्री यांच्या हस्ते लाँच करण्यात आले. यामध्ये आता ऑनलाईन व डिजिटल मानवी तस्करीची ओळख पटवण्याची क्षमता वाढविण्यात आली आहे. हे सॉफ्टवेअर फेसबुक, इंस्टाग्रामसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून फसवी नोकरीची जाहिरात, एस्कॉर्ट सर्व्हिसेस आणि दिशाभूल करणाऱ्या ऑनलाईन जाहिरातींवर बारीक नजर ठेवणार आहे.
तसेच, शहरातील संवेदनशील ठिकाणी बसविण्यात आलेले फेशियल रिकग्निशन कॅमेरे हरवलेल्या महिला व मुलांची ओळख पटवण्यास मदत करणार असून, संशयित गुन्हेगारांवर देखील सतत लक्ष ठेवणार आहेत. यामुळे पोलिसांना त्वरित अलर्ट मिळणार असून, तातडीने कारवाई करणे शक्य होईल.
ऑपरेशन शक्तीच्या माध्यमातून स्मार्ट पोलिसिंगमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नागपूर शहर अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. या उपक्रमामुळे नागपूर केवळ स्मार्ट सिटीच नव्हे तर सेफ सिटी होण्याच्या दिशेनेही एक मोठे पाऊल टाकत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


