नागपूर शहरात ट्रॅव्हल्सला आता ‘नो एन्ट्री’
नागपूर शहरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघातांचा संभाव्य धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने बुधवार १३ ऑगस्टपासून शहराच्या हद्दीत खाजगी ट्रॅव्हल्स बसेसना प्रवेशासाठी बंदी लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

नागपूर : शहरातील वाढती वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि अपघातांचा संभाव्य धोका दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने बुधवार १३ ऑगस्टपासून शहराच्या हद्दीत खाजगी ट्रॅव्हल्स बसेसना प्रवेशासाठी बंदी लागू करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. खासगी बस चालक शहराच्या कोणत्याही भागातल्या हद्दीतून प्रवासी घेता अथवा सोडता येणार नाहीत. खासगी ट्रॅव्हल्स बस चालकांना स्वतःची जागा असल्याशिवाय शहराच्या आत बसेस पार्कही करता येणार नाहीत.
गणेशोत्सवाचा काळ लक्षात घेता वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी जारी केलेल्या नव्या आदेशानुसार पुढील महिनाभर खासगी ट्रॅव्हल्स बस चालकाना शहरात प्रवेशासाठी बंदी लागू राहणार आहे. शहराची लोकसंख्या अंदाजे ३० ते ३२ लाखाच्या आसपास आहे. त्यात सध्याच्या स्थितीत अंदाजे २० लाख दुचाकी आणि ५ लाख चारचाकी वाहने रस्त्यावर धावतात. शहरातील सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे आधीच रस्त्यांची रुंदी कमी झाली आहे. त्यातून वाहतूक कोंडी वाढत आहे. सकाळी व सायंकाळी रोज चाकरमान्यांना संथ वाहतूक आणि कोंडीचा सामना करावा लागतो.
यातच केंद्रिय मार्ग, विजय टॉकीज चौक, कॉटन मार्केट, व्हेरायटी चौक, रहाटे कॉलनी, रविनगर, वाडी, हिंगणा, दिघोरी नाका , ऑटोमोटिव्ह चौकांसारख्या महत्वाच्या चौकांवर खाजगी ट्रॅव्हल्सच्या अनधिकृत पिकअप-ड्रॉपमुळे कोंडी, वायू आणि ध्वनीप्रदूषण वाढत आहे. वाहतूक पोलिसांनी घेतलेल्या नोंदीनुसार सध्या शहरात रोज वेगवेगळ्या मार्गांनी ६४२ खासगी ट्रॅव्हल्सच्या बसेस धावतात. यात या मार्गावरील वाहनांचा समावेश आहे. त्यामुळे वाहतूक शाखेने हा धाडसी निर्णय घेतला आहे.




