नागपूर ट्राफिक पोलिसांचा माणुसकीचा परिचय; मॅक्सी चालकाचा जीव वाचवून दाखवली उत्कृष्ट कामगिरी

नागपूर : पोलिसांची प्रतिमा अनेकदा कठोर व कायदा अंमलात आणणाऱ्यांची असते, मात्र वेळ पडली की हेच पोलीस जीव वाचविण्यासाठी देवदूत ठरतात याचे जिवंत उदाहरण नागपूरमध्ये पाहायला मिळाले.
रेल्वे स्टेशन रोडवर एका मॅक्सी चालकाला अचानक मिरगीचा झटका आला आणि तो रस्त्यावर कोसळला. जोरदार मार बसल्यामुळे डोक्यात व चेहऱ्यावर गंभीर दुखापत झाली व रक्तस्राव सुरू झाला. ही धक्कादायक घटना वाहतूक विभागातील पोलीस कर्मचारी संदीप मनस्कर यांच्या नजरेस पडली.
क्षणाचाही विलंब न लावता मनस्कर यांनी मानवी कर्तव्य पार पाडत तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. घटनास्थळी जमलेल्या स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने त्यांनी जखमी व्यक्तीला उचलले आणि अॅम्बुलन्सची वाट न पाहता स्वतःच्या पैशाने ई-रिक्शामध्ये बसवून थेट मेओ हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले असून त्यामुळे त्या व्यक्तीचा जीव वाचला.
जखमी व्यक्ती शुद्धीवर नसल्याने त्याचे नाव कळू शकले नाही. मात्र ट्राफिक पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे व माणुसकीमुळे आज एक जीव वाचला आहे. या घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी ट्राफिक पोलिसांचे मनापासून कौतुक केले.
नागपूर पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिले की, “पोलिस फक्त कायदा राखणारे नाहीत तर संकटात उभा ठाकणारा खरा मित्र आहेत.”



