नागपूरात कंत्राटदारांचं ‘भीक मांगो’ आंदोलन; शासनाच्या थकबाकी विरोधात संविधान चौकात अनोखा संताप प्रदर्शन

नागपूर :
राज्यातील विविध विभागांमध्ये पूर्ण झालेली कामं असूनही शासनाकडून आपला मोबदला न मिळाल्यामुळे राज्यातील कंत्राटदार संतप्त झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर नागपूरातील संविधान चौकात आज कंत्राटदारांनी अनोख्या पद्धतीने “भीक मांगो आंदोलन” करून शासनाचे लक्ष वेधले.
सार्वजनिक बांधकाम विभाग, जल जीवन मिशन, सिंचन व अन्य अनेक विभागांतर्गत कंत्राटी कामं पूर्णत्वास नेल्यानंतर देखील शासनाकडून कंत्राटदारांना निधी मिळाला नाही. दीर्घकाळ थकबाकी प्रलंबित असल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कंत्राटदारांना कामगारांचा पगार, बँक कर्ज तसेच प्रकल्प खर्च भागवणे कठीण झाले आहे.
आजच्या आंदोलनात कंत्राटदारांनी “देवा भाऊ पैसे द्या – तुमचं जमलं आता आमचं जमवा”, “काम केलं, मोबदला द्या” असे नारे देत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनादरम्यान हातात पाट्या, भीकची वाटी घेऊन कंत्राटदार रस्त्यावर उतरले.
कंत्राटदार संघटनांनी इशारा दिला आहे की,
जर शासनाने तातडीने थकबाकीचे पैसे दिले नाहीत, तर येत्या काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. आवश्यक असल्यास राज्यभरातील कामं ठप्प करण्याचा निर्णय देखील घेतला जाईल.




