नागपूरात कुख्यात गुंड शस्त्रासह जेरबंद; गुन्हे शाखेची धडक कारवाई

नागपूर : नागपूर पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-५ ने धाडसपूर्ण कारवाई करत कुख्यात सराईत गुंड मोहम्मद इमरान मोहम्मद कमर अन्सारी (रा. संघर्ष नगर, यशोधरानगर) यास प्राणघातक पिस्तूल व जिवंत काडतूसासह अटक केली.
१२ ऑगस्ट २०२५ रोजी पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की अन्सारीकडे बेकायदेशीर पिस्तूल असून तो गंभीर गुन्ह्याची योजना आखत आहे. तत्काळ कारवाई करत पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला टाळाटाळीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यानंतर त्याच्या राहत्या घराची झडती घेतली असता पिस्तूल व जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले.
तपासात उघड झाले की आरोपीवर यापूर्वी खून, खुनाचा प्रयत्न, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे तसेच चोरी-डकैती अशा अनेक गंभीर गुन्ह्यांचे विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंद आहेत.
आरोपीविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३, २५ तसेच मपोका कलम १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त केलेले शस्त्र यशोधरानगर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली, युनिट-५ च्या पथकाने केली.


