नागपूरच्या फ्रेंडशिप डे पार्टीत धिंगाणा! आयोजकाची पोलिसांना खुलेआम धमकी – “मी थेट बावनकुळेंना फोन करतो”

नागपूर – शहरात फ्रेंडशिप डेच्या रात्री ‘फ्रेंड्स अँड बियॉंड’ नावाची एक पार्टी वादात अडकली असून, ती आता थेट राजकीय रंग घेत असल्याचे चित्र आहे. कामठी रोडवरील एडन ग्रीन्स रिसॉर्ट येथे रविवारी मध्यरात्री झालेल्या या पार्टीत दोन गटांमध्ये तीव्र वाद झाला. माहिती मिळताच जुनी कामठी पोलिस स्टेशनचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
मात्र, वाद शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आयोजकाचा उर्मट आणि धमक्याचा सूर सहन करावा लागला.
व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये आयोजक पोलिस अधिकाऱ्याला थेट धमकावताना दिसतो – “मी थेट बावनकुळेंशी बोलेन” असे तो मोठ्या तोऱ्यात म्हणतो.
या विधानामुळे राजकीय हस्तक्षेपाचा संशय निर्माण झाला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, आयोजकाने राज्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव घेत दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.
पोलिस निरीक्षक प्रशांत जुमडे यांनी सांगितले की, “आम्ही पोहोचलो तेव्हा गोंधळ सुरु होता. संगीत बंद करून परिस्थिती नियंत्रणात आणली. दोन्ही गटांनी समजूत काढल्यामुळे कोणतीही तक्रार दाखल झाली नाही.”
तथापि, व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप होऊ लागला आहे.
डीसीपी निकेतन कदम यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना सांगितले – “व्हिडिओची चौकशी सुरू आहे आणि आयोजकाला लवकरच चौकशीसाठी बोलावण्यात येईल.”