नागपुरात भोंदूबाबाचा प्रताप उघड – नग्न पूजेचा व्हिडिओ पाठवत महिलेला जीवे मारण्याच्या धमक्या; पोलिसांकडून अटक

नागपूर : अंधश्रद्धेच्या आडून महिलांची फसवणूक करणाऱ्या एका भोंदूबाबाचा प्रताप अखेर उघडकीस आला आहे. कुटुंबावरील संकट दूर करण्याचे आश्वासन देत या भोंदूबाबाने एका महिलेशी ओळख वाढवली. तिच्या घरात प्रवेश मिळवून तो अनेक दिवसांपासून तिच्यासोबत अश्लील कृत्य करीत होता. एवढेच नाही तर महिलेला नग्न पूजेचा व्हिडीओ पाठवून तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याच्या धमक्या देखील दिल्या. अखेर पीडित महिलेने धाडस दाखवत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आणि भोंदूबाबाच्या कृत्याचा भांडाफोड झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव हबिबुल्ला मलिक उर्फ मामा उर्फ लाल बाबा उर्फ अनवर अली मुल्लीक (वय ५५, रा. प्रेमनगर, झेंडा चौक, शांतीनगर) असे आहे. तो स्वतःला तांत्रिक म्हणवून घेत महिलांची आणि पुरुषांची अडचण सोडवतो, असा खोटा दावा करत असे.
पीडित महिलेचा पतीशी घरगुती कारणांवरून वाद सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर आरोपीने महिलेच्या जवळीक साधली. ‘मी तुझी समस्या तंत्रमंत्राने दूर करू शकतो’ असे सांगून त्याने महिलेला फसवले. नंतर तिच्या पतीशीही मैत्री करून घरात वावर वाढवला.
या काळात महिलेला त्रास देत आरोपीने अश्लील कृत्ये केली आणि धमकावून तिला गप्प बसवले. मात्र अखेर महिलेला संशय आला आणि धाडस करून पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.




