नागपुरात बनावट नोटांचा साठा उघड – दोन युवकांना अटक, 500 रुपयांच्या 243 नोटा जप्त

नागपूर शहरात नकली नोटांचे प्रकरण उघडकीस आले आहे. तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गार्ड लाईन परिसरात पोलिसांनी दोन तरुणांना बनावट नोटांसह रंगेहाथ अटक केली आहे. या दोघांकडून ५०० रुपयांच्या एकूण २४३ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गस्तीदरम्यान गुप्त माहितीच्या आधारे पोलिस उपनिरीक्षक रसूल शेख यांच्या नेतृत्वाखाली टीमने गार्ड लाईन परिसरात झडप घातली. बगदादी शाह दर्गा परिसरात संशयित हालचाल करताना दोन तरुण आढळले. त्यांच्याकडून एका काळ्या पिशवीत लपवलेल्या २४३ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.
या नोटांची छपाई, कागद आणि वॉटरमार्क हे सगळे खरे नोटांपेक्षा वेगळे असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. विशेष म्हणजे अनेक नोटांवर एकच नंबर असल्याने बनावट असल्याची खात्री पटली.
पोलिसांनी दोघांकडून दोन मोबाईल फोन देखील जप्त केले आहेत. पंचनामा करून सर्व मुद्देमाल ताब्यात घेतला असून, आरोपींविरुद्ध तहसील पोलीस ठाण्यात भादंवि कलम १७९, १८० आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.