नांदा-सावरगाव रोडवर भीषण अपघात : युवक ठार, तरुणी गंभीर जखमी

सावनेर : – सावनेर तहसीलतील केलवाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नांदा-सावरगाव रोडवर शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला असून सोबत प्रवास करणारी तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
मृत तरुणाचे नाव ऋतिक रविंद्र रडके (२२) असे असून तो दुचाकीने श्रेया राजेश बेरड (रा. आग्रा, नरखेड़) हिच्यासोबत प्रवास करत होता. दरम्यान, नांदा-सावरगाव रोडवर अज्ञात वेगवान वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की ऋतिकचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मागे बसलेली श्रेया गंभीर जखमी झाली.
अपघाताची माहिती मिळताच सावनेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने श्रेयाला उपजिल्हा रुग्णालय, सावनेर येथे उपचारासाठी हलवले. मात्र तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिला नागपूर येथील शासकीय रुग्णालयात रेफर केले. दुसरीकडे पोलिसांनी पंचनामा करून ऋतिकचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविला.
या संदर्भात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



