ऑटो चालकांनी व्यापाऱ्यावर केला जीवघेणा हल्ला; कुख्यात आरोपी अक्षय भैसारेसह तिघे पोलिसांच्या जाळ्यात

नागपूर : जरीपटका पोलीस ठाणे हद्दीत उशिरा रात्री घडलेल्या घटनेने नागपूरकरांना हादरवून सोडले. किरकोळ कट लागण्याच्या वादातून कुख्यात गुन्हेगार अक्षय भैसारे याने आपल्या दोन साथीदारांसह पेट्रोल पंप व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला केला. व्यापाऱ्यावर चाकू-कोयत्याने प्राणघातक वार करण्यात आले असून त्याच्या गाडीची चावी आणि रोख रक्कम लुटण्यात आली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करून अक्षय भैसारेसह तिघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी राशिद मेहंदी (वय ६३) हे पेट्रोल पंप व्यवसायिक असून, ते आपल्या मित्रासह इनोव्हा कारने बेझनबाग परिसरात जात होते. यावेळी त्यांच्या गाडीला ऑटो रिक्षाचा किरकोळ कट लागला. यावरून ऑटो चालक व त्यांच्या साथीदारांनी संतापून व्यापाऱ्याशी वाद घातला. वाद वाढताच आरोपींनी इनोव्हाचे पुढचे काच फोडले, व्यापाऱ्याला मारहाण केली तसेच चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर कोयत्याचा धाक दाखवत गाडीची चावी हिसकावून घेतली आणि ‘ऑटोचे नुकसान झाले’ या कारणावरून व्यापाऱ्याच्या खिशातून एक हजार रुपये काढून नेले.
जखमी व्यापाऱ्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी लूट, मारहाण व तोडफोड यांसह गंभीर गुन्ह्यांची नोंद केली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या शोधमोहिमेत पोलिसांनी आरोपी अक्षय भैसारे आणि त्याचे दोन अल्पवयीन साथीदारांना अटक केली.
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे अक्षय भैसारे हा पोलिसांच्या रडारवर असलेला कुख्यात गुन्हेगार असून, त्याच्याविरुद्ध यापूर्वीच तब्बल १२ गुन्हे नोंदवले गेले आहेत. इतकेच नव्हे तर, त्याला काही काळापूर्वी तडीपारही केले होते.
सध्या पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला आहे.




