पारशिवनीत अवैध रेती उत्खननावर कारवाई – १ कोटी ४२ लाखांचा मुद्देमाल जप्त, पाच जण अटकेत

नागपूर : जिल्ह्यातील पारशिवनी तहसील अंतर्गत पालोरा घाट येथे सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर पोलिसांनी मोठी कारवाई केली. पारशिवनी पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या संयुक्त पथकाने केलेल्या या छाप्यात तब्बल १ कोटी ४२ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सहायक पोलिस निरीक्षक मनोज गदादे यांच्या नेतृत्वाखाली पेंच नदीवरील पालोरा रेती घाटात ही कारवाई करण्यात आली. यात २ ट्रक, पोकलेन मशीन, जेसीबी मशीन, मोबाईल तसेच १४० ब्रास रेती असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या रेती चोरीचा सरगना कमर अहमद सिद्दीकी व तबरेज अहमद सिद्दीकी असल्याचे समोर आले असून पोलिसांनी निकेश नारायण सिंह, अमित देशमुख, मोहम्मद कमर ताजुद्दीन खान, राजेंद्र शेंडे व सुजाद अहमद सिद्दीकी अशा एकूण ५ जणांना अटक केली आहे.
घटनेची माहिती मिळताच पारशिवनीचे तहसीलदार सुरेश वाघचवरे व त्यांची टीम यांनी देखील घटनास्थळी भेट दिली. या कारवाईमुळे परिसरातील अवैध रेती उत्खननाविरोधात मोठा धाक बसला आहे.



