पवित्र भूमीची ही चाड नाही गप्पा मात्र मोठमोठ्या

नागपूर :- नागपुरातल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील एक बातमी नुकतीच वाचण्यात आली. प्राध्यापिका असलेल्या पन्नशीला आलेल्या स्त्रीला तुला या कॉलेजचे प्राचार्य बनवतो, असे आमिष दाखवीत तिचा मानसिक छळ तर गेल्या अनेक दिवसांपासून सुरूच आहे, पण 23 जुलैला दुपारी चार साडेचार वाजताच्या सुमारास तिने कॉलेजच्या गेट समोर लावलेल्या गाडीत घरी जाण्यासाठी कारच्या सीटवर बसली असताना मेंढे त्यांच्या कारजवळ गेला आणि पिडीतेचा हात पकडून म्हणाला, “तुझ्या घरी कोणीच नसते. मला घरी घेऊन चल. मला खुश कर. तुला प्राचार्य बनवतो. कोणाला माहित होणार नाही. आणि तुला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही. मला तू फक्त खुश कर.” अशा अश्लील शब्दात अपमानित केल्याचा म्हणजेच विनयभंग केल्याचा प्राध्यापिकेचा आरोप आहे.
म्हणजे घरी एकटं राहणाऱ्या मुली/ स्त्रिया; ज्यांना भाऊ नाही, वडील नाहीत अशा स्त्रिया अन्य पुरुषांना एनीटाईम उपलब्ध असतात असा या पुरुषांचा समज आहे का? ही या पुरुषांची स्त्रियांकडे बघण्याची मानसिकता आहे का? दीक्षाभूमीमध्ये उभे राहण्याच्या लायकीचे हे आहेत का?
अरुण जोसेफ आणि रवी मेंढे अशी आरोपींची नावे आहेत. पीडित महिला सहयोगी प्राध्यापिका पीएच.डी. असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात कार्यरत आहे. प्रमोशन संदर्भात लेखी अर्ज देण्यासाठी त्या 20 मे 25 रोजी महाविद्यालयातील आवक जावक शाखेत गेल्या होत्या. तिथे नियुक्त महिला कर्मचाऱ्यांनी पत्र स्वीकारण्यास नकार दिला. “तुमच्याकडून कुठल्याही प्रकारचे अर्ज स्वीकारण्यास अरुण जोसेफ यांनी मनाई केली” असे त्या महिला कर्मचाऱ्याने सांगितले. पिडीतेचे आणि कर्मचारी महिलेचे बोलणे सुरू असतानाच जोसेफ प्रध्यापिकेच्या अंगावर धावून गेला. अश्लील हातवारे करीत शिवीगाळ केली. सर्वांसमोर अपमानित केले. ” तू मेरे तुकडोपे पल रही है. तुला आत्महत्येस बाध्य करीन” अशा शब्दात धमकी दिली. पीडित महिला एवढी प्राध्यापिका असताना तिच्या पगाराची कल्पना आपण करू शकतो. अशा स्त्रीला याच्या तुकड्यांवर पलण्याची गरज असू शकते काय? आणि हा कोण एखाद्या बाईला त्याच्या तुकड्यांवर पाळणारा? पिडीतेने या प्रकरणाची तक्रार महाविद्यालयीन कमिटीकडे केलेली आहे. परंतु कुठल्याच प्रकारची कार्यवाही मेंढे आणि जोसेफ वर कमिटी कडून अद्याप झालेली नाही, हेही एक आश्चर्यच आहे. यात सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा आहे की अरुण जोसेफ आणि रवी मेंढे हे दोघेही त्या महाविद्यालयांमध्ये रेग्युलर कर्मचारी नाहीत. तरीही ते सहयोगी प्राध्यापिका सारख्या जबाबदार पदावर असलेल्या आणि आपल्या विषयात तज्ञ असलेल्या महिलेसोबत अशा असभ्य भाषेत कसे काय बोलू शकतात? आणि या महाविद्यालयात कार्यरत नसलेल्या दोन पुरुषांना कमिटीतले लोक का घाबरतात? त्याहीपेक्षा आश्चर्यकारक बाब तर ही आहे की दीक्षाभूमीसारख्या पवित्र प्रांगणामध्ये असलेलं डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, ज्याची ख्याती अख्या जगात आहे, त्या पवित्र दीक्षाभूमी वातावरणामध्ये अशा प्रकारचे कृत्य होत असेल तर यावर काय बोलायला पाहिजे? मुळात ज्या डॉ. आंबेडकरांनी सतत महिलांचा आदर करायला सांगितले, ज्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाची निर्मिती केली; त्या संविधानामध्ये स्त्रियांच्या आदराबद्दल तर लिहिलेच आहे पण स्त्री-पुरुष समानतेबद्दल बोलल्या जाते, त्याच भूमीमध्ये मात्र एका विदूषीचा त्या महाविद्यालयाशी काहीही संबंध नसलेल्या पुरुषांकडून असा अवमान होत असेल तर याला काय म्हणावे?



