रामटेकमध्ये मद्यधुंद युवकांचा रस्त्यावर कहर; २५-३० नागरिकांना कारने उडवलं, ग्रामस्थांकडून चोप

रामटेक (नागपूर): रामटेक तहसीलमधील नागरधन गावात सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास मद्यधुंद अवस्थेतील एका व्यक्तीने कार चालवत अनेकांना धडक दिली. भारतीय सैन्यात कार्यरत असलेला आणि सध्या रजेवर आलेला हर्षपाल महादेव वाघमारे (४०) या व्यक्तीने आपल्या I-10 कारने २५ ते ३० नागरिकांना उडवलं. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
वाघमारे हा चार दिवसांपूर्वीच असममधून गावी आला होता. मद्यधुंद अवस्थेत त्याने नागरधन येथील साई मंदिर व दुर्गा चौक परिसरातून हमलापुरीकडे जाताना वाहनावर नियंत्रण गमावले. गावातील नागरिकांना धडक दिल्यानंतर तो घटनास्थळावरून फरार होण्याचा प्रयत्न करीत होता. मात्र, त्याची कार हनुमान मंदिराजवळ एका झाडाला धडकली आणि जवळच्या नाल्यात जाऊन पडली.
ग्रामस्थांनी त्याचा पाठलाग करून त्यास पकडले व चोप दिला. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. रामटेक पोलिसांनी त्याला ताब्यात घेत उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केलं. रामटेक पोलीस ठाण्याचे ठाणेदार रविंद्र मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.