Uncategorized

राष्ट्रीय महामार्गावरुन जात असलेल्या युवकावर वीज पडून जागीच मृत्यू

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौदा तहसील परिसरात बुधवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना घडली. राष्ट्रीय महामार्गावरून जात असलेल्या २७ वर्षीय युवकावर अचानक आकाशीय विजा कोसळली. या प्रचंड प्रहारात युवकाचा जागीच मृत्यू झाला. मृतकाची ओळख सागर पंढरीची जुमाले (वय २७, रा. धामणगाव) अशी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सागर जुमाले हे एनटीपीसीमध्ये कार्यरत होते. बुधवारी आपले काम आटोपून ते नागपूरहून धामणगावकडे दुचाकीवरून परतत होते. नागपूर-भंडारा राष्ट्रीय महामार्गावरील महलागाव- कढोलीजवळ ते पोहोचताच अचानक मुसळधार पावसासह आकाशात वीज कडाडली आणि सागर यांच्यावर कोसळली. विजेच्या या प्रहारात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

 

ही दुर्दैवी घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. मौदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला व मृतदेह पोस्टमार्टमसाठी मौदा येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला.

दरम्यान, या अपघाती मृत्यूमुळे धामणगाव गावात शोककळा पसरली आहे. अविवाहित असलेल्या सागर यांच्या आकस्मिक निधनाने जुमाले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ग्रामस्थ व नातेवाईक शोकाकुल वातावरणात सागर यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button