सराफा बाजारातील बुजुर्ग महिलेचे दागिने लंपास करणाऱ्या महिला टोळीचा पर्दाफाश – पोलिसांच्या जाळ्यात तीन आरोपी, साडे 15 लाखांचे दागिने जप्त

नागपूर : सराफा बाजारात खरेदीसाठी आलेल्या एका 64 वर्षीय महिलेला लक्ष्य करून तब्बल साडे 15 लाख रुपयांचे सोने लंपास करणाऱ्या महिलांच्या टोळीचा नागपूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आली असून चोरीस गेलेले सर्व 155 ग्रॅम सोने पोलिसांनी हस्तगत केले आहे.
शांतीनगर निवासी शकीरा ताहिर गोहर (वय 64) या महिला 25 ऑगस्ट रोजी दुपारी तहसील परिसरातील सराफा बाजारात खरेदीसाठी गेल्या होत्या. यावेळी शहीद चौकाजवळील गर्दीचा फायदा घेत अज्ञात महिलांनी त्यांच्या पर्समधून दागिने लंपास केले आणि पसार झाल्या.
प्रकरणी तक्रार नोंदविल्यानंतर पोलिसांनी तत्काळ सीसीटीव्ही फुटेज तपासले. गुप्त माहितीच्या आधारे अजनी परिसरात सक्रिय असलेल्या टोळीपर्यंत पोलीस पोहोचले. सापळा रचून पोलिसांनी आंचल सुशील हातगडे व मंजू हातगडे या दोन महिलांना पकडले. चौकशीत उघड झाले की चोरीचे दागिने आंचलच्या पती सुशील हातगडे याच्याकडे ठेवण्यात आले होते. त्यामुळे त्यालाही अटक करण्यात आली.
कारवाई दरम्यान पोलिसांनी चोरीस गेलेले सर्व 155 ग्रॅम सोने जप्त केले आहे. तपासात उघडकीस आले की ही टोळी गर्दीच्या ठिकाणी विशेषतः वयोवृद्ध महिलांना लक्ष्य करून चोरी करत होती. या प्रकरणी अन्य महिलांची संलग्नता असल्याचेही समोर आले असून त्यांचा शोध सुरू आहे.


