९ तोळे सोन्याची चोरी करणारा अट्टल चोर अटक,सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी अटक

नागपूर : गिट्टीखदान पोलिसांनी आठ दिवसांपूर्वी घडलेल्या मोठ्या चोरीचा पर्दाफाश करत अट्टल चोरट्यासह दोन बालगुन्हेगारांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईतून तब्बल ९ तोळ्यांचं सोनं तसेच चोरीसाठी वापरलेली दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.
ही घटना १८ ऑगस्ट रोजी गिट्टीखदान परिसरात घडली होती. फिर्यादी महेश्वरी मारोती येवले या आपल्या आईला तपासणीसाठी रुग्णालयात घेऊन गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावले होते. मात्र परत आल्यानंतर घराचे कुलूप तुटलेले आणि कपाटातील सोन्याचे दागिने गायब असल्याचे लक्षात आले.
चोरी झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल सर्व्हिलन्सच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांना आरोपी यश मनोज निमजे (रा. गोलीबार चौक, गवलीबाबा मंदिर परिसर) याचा ठावठिकाणा लागला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यासह चोरीत सहभागी असलेले दोन अल्पवयीन साथीदार देखील पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
त्यांच्या निशानदेहीवर पोलिसांनी ९ तोळ्यांचे सर्व सोन्याचे दागिने तसेच या गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही जप्त केली. विशेष म्हणजे, ही दुचाकीही पारडी परिसरातून चोरीला गेली असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
गिट्टीखदान पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे.




