उच्च न्यायालयाने नागपूर विद्यापीठाचा घेतला ‘क्लास’,तीन विषयात पैकीच्या पैकी मार्क; सर्वच विषयात हुशार; तरीही विद्यार्थ्याला केले ‘नापास’

नागपूर विद्यापीठाचा भोंगळ कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. तीन विषयात पैकीच्या पैकी गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यालाच विद्यापीठाने नापास ठरवले. एका हुशार विद्यार्थ्याला अशी वागणूक दिल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे इतर विषयात सुद्धा या मुलाने प्राविण्य मिळवले आहे. सर्व विषयात पास असताना नापास ठरवण्याचा प्रताप नागपूर विद्यापीठाने केला आहे. याप्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेतली असता नागपूर खंडपीठाने विद्यापीठाची पिसं काढली. कडक शब्दात सुनावले. उच्च न्यायालयाने विद्यापीठाच्या कारभारावर ताशेरे ओढले आहे. तर विद्यापीठ आणि संबंधीत महाविद्यालयाला नोटीस बजावली आहे.
सर्वेश घोटाळे या गुणवंत विद्यार्थ्याला विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराचा फटका बसला आहे. त्याला तीन विषयात १०० पैकी १०० गुण, उरलेल्या पाच विषयांत ८० ते ९० टक्के गुण मिळाले आहे. तरीही नागपूरातील सर्वेश घाटोळे या BA च्या विद्यार्थ्यांला नापास करण्याचा चमत्कार नागपूर विद्यापीठाने केला आहे. विद्यापीठाच्या या भोंगळ कारभाराचा सर्वेश घाटोळे या विद्यार्थ्यासोबतंच नागपूरातील वसंतराव नाईक महाविद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांना सहन करावा लागलाय.
सर्वेश याला न्याय मिळवण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली. सर्वेश घाटोळे हा वसंतराव नाईक म्हणजेच मॅारीस महाविद्यालयातील बीए प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. त्याला समाजशास्र, मराठीमध्ये १०० पैकी १०० गुण मिळाले. इतर पाच विषयात त्याला ८० ते ९० टक्के गुण आहे. पण मार्क्सशीट आली तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण इतके गुण घेऊनंही त्याला नापास दाखवण्यात आले.
त्याने आपल्या महाविद्यालयात तक्रार केली काही फायदा झाला नाही, विद्यापीठात तक्रार केली न्याय मिळाला नाही. शेवटी त्याने हायकोर्टात धाव घेतली. नागपूर खंडपीठाने त्याला न्याय दिला, विद्यापीठ आणि कॅालेज प्राचार्याला नोटीस बजावली. आता या प्रकारानंतर आपली उरली सुरली लाज विद्यापीठ शाबूत ठेवेल आणि विद्यार्थ्याला नवीन गुणपत्रिका तातडीने देईल अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडून चुकीबद्दल खेद व्यक्त करण्याच्या आशेवर सुद्धा पाणी सोडले आहे, त्यांना केवळ त्यांची नवीन सुधारीत उत्तीर्ण असल्याची गुणपत्रिका हवी आहे.




