उमरेड रोडवर भीषण अपघात : खासगी बसने मोटारसायकलला दिली धडक; दोन जखमी, संतप्त नागरिकांनी बसचालकाला धोपटले

नागपूर : वाठोडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उमरेड रोडवर आज दुपारच्या सुमारास भीषण अपघात झाला. एका खासगी बसने मोटारसायकलला जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील दोन व्यक्ती गंभीररित्या जखमी झाले. जखमींना तात्काळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, वेगाने येणाऱ्या खासगी बसने अचानक मोटारसायकलला धडक दिली. या धडकेत मोटारसायकलवरील दोन युवक रस्त्यावर फेकले गेले व गंभीर जखमी झाले. घटनेनंतर परिसरात मोठी गर्दी जमली. संतप्त नागरिकांनी बस चालकाला पकडून चोप दिला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चालकाला ताब्यात घेतले व परिस्थिती नियंत्रणात आणली.
सध्या जखमींच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती मिळाली नसली तरी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे काही काळ उमरेड रोडवर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी बस जप्त करून पुढील तपास सुरू केला आहे.



