४४ वर्षांची प्रतीक्षा अखेर संपली!पाकिस्तानातून आलेल्या ब्रेंडन क्रॅस्टो यांना भारतीय नागरिकत्व
सीएए अंतर्गत मुख्यमंत्री सावंत यांच्याहस्ते गोव्यातील तिसऱ्या व्यक्तीस भारतीय नागरिकत्व प्रदान

नागपूर : – २००६ पासून हणजूण येथे राहणारे पाकिस्तानी नागरिक ब्रेंडन व्हॅलेंटाईन क्रॅस्टो यांना आज सोमवारी नागरिकत्व (सुधारणा) कायदा (सीएए), २०१९ अंतर्गत अधिकृतपणे भारतीय नागरिकत्व देण्यात आले. पर्वरी येथील मंत्रालयाच्या सभागृहात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते क्रॅस्टो यांना नागरिकत्व प्रमाणपत्र देण्याचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गोवा सरकारचे मुख्य सचिव श्रीमती चेस्ता यादव, आयएएस उपस्थित होत्या.
याअगोदर कासावली येथील जोसेफ फ्रान्सिस परेरा यांना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले होते. सीएए अंतर्गत नागरिकत्व मिळालेले परेरा हे प्रथम तर ब्रेंडन क्रॅस्टो हे तिसरे नागरिक ठरले आहेत. श्री. क्रॅस्टो यांनी २०१४ मध्ये भारतीय नागरिक असलेल्या श्रीमती मेरिलिन फर्नांडिस यांच्याशी लग्न केले आणि तेव्हापासून ते गोव्यात वास्तव्य करत होते.
क्रास्टो यांना मुख्यमंत्र्यानी दिल्या शुभेच्छाः-
दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी सीएए अंतर्गत नागरिकत्व मिळालेल्या क्रास्टो यांचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अभिनंदन केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “नागरिकत्व (सुधारणा) कायद्याची अंमलबजावणी केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे आभार मानतो. गोव्यात सीएए अंतर्गत नागरिकत्व देण्याची ही तिसरी घटना आहे. या कायद्याने येथे आश्रय घेतलेल्यांना आपल्या देशात आशा आणि योग्य स्थान दिले आहे.
कायदा कोणासाठी उपयुक्तः-
भारतीय संसदेने डिसेंबर २०१९ मध्ये नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेत ‘सीएए’ ला मंजुरी दिली, पण त्याची अंमलबजावणी झाली नव्हती. मार्च २०२४ मध्ये याचे कायद्यात रुपांतर झाले. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे (सीएए) ३१ डिसेंबर २०१४ पूर्वी भारतात स्थलांतर केलेल्या पाकिस्तान, बांगलादेश व अफगाणिस्तान या देशातील हिंदू, बौद्ध, जैन, पारशी, शीख व ख्रिश्चन नागरिकांना भारतीय नागरिकत्व घेणे शक्य झाले आहे.


