बंगालच्या उपसागरात निम्नदाब क्षेत्राची निर्मिती; 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान विदर्भात पावसाचा जोर वाढणार

नागपूर :
राज्यातील हवामान पुन्हा बदलणार आहे. बंगालच्या उपसागरावर 24 सप्टेंबर रोजी निम्नदाब क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हे निम्नदाब क्षेत्र 28 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात पोहोचेल, असे अंदाज असून त्याचा प्रभाव राज्यातील विविध भागांवर दिसणार आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, 26 ते 28 सप्टेंबरदरम्यान विदर्भात पावसाचा जोर वाढणार आहे. या काळात ढगाळ वातावरण राहून जोरदार सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
22 ते 25 सप्टेंबर या कालावधीत दुपारनंतर वीजांसह हलका पाऊस पडेल.
26 सप्टेंबरपासून निम्नदाब क्षेत्राचा प्रभाव स्पष्ट होईल. या दिवशी विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व व दक्षिण भागात पावसाची तीव्रता वाढेल.
27 सप्टेंबरला विदर्भ, मराठवाडा, खानदेश, कोकण व मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता नाकारता येत नाही.
👉 28 सप्टेंबरला पश्चिम महाराष्ट्रातही पावसाची तीव्रता कायम राहील.
यामुळे मान्सूनची परतीची प्रक्रिया किमान 30 सप्टेंबरपर्यंत लांबणार असल्याचे संकेत हवामान खात्याने दिले आहेत.
दरम्यान, हवामान विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. आधीच कापणी झालेली पिके किंवा शेतात ठेवलेले उत्पादन पावसापासून सुरक्षित ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पुढील कृषी नियोजन करताना या हवामान बदलाचा विचार करण्याचे निर्देश दिले आहेत.

