चिमुकल्यांना आमिष दाखवून लैंगिक चाळे करणारा आटोचालक पोलिसांच्या जाळ्यात
आठ-दहा वर्षांच्या मुलांवर अत्याचाराचा प्रयत्न; मानकापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाईNagpur

नागपूर : – आठ ते दहा वर्षे वयोगटातील निरागस मुलांना फिरविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याशी लैंगिक चाळे करणाऱ्या नराधम आटोचालकाला मानकापूर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलांना आपल्या आटोत बसवून फिरायला नेण्याचे आमिष दाखवत असे. मात्र फिरविण्याच्या नावाखाली तो त्यांच्याशी अश्लील वर्तन करून लैंगिक चाळे करीत होता. या घृणास्पद प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणी संबंधित पालकांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गंभीर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास मानकापूर पोलीस करीत आहेत.
दरम्यान, पोलिसांनी पालकांना आवाहन केले आहे की लहान मुलांना ओळखीबाहेरील व्यक्तींसोबत पाठवू नये तसेच अशा संशयास्पद हालचाली दिसल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, जेणेकरून मुलांचे रक्षण होऊ शकेल.


