“धम्मचक्र प्रवर्तन दिन व कोराडी नवरात्रोत्सवासाठी पालकमंत्र्यांकडून सर्व विभागांना समन्वयाने तयारी पूर्ण करण्याचे निर्देश”

नागपूर :-धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी आणि कामठी येथील ड्रॅगन पॅलेस येथे तसेच कोराडी येथे नवरात्रोत्सवाची सर्व व्यवस्था संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून पूर्ण करण्याची गरज आहे. पिण्याचे पाणी, साफसफाई, प्रकाश व्यवस्था, बसेसची व्यवस्था, पोलीस व्यवस्था, अग्निशामक उपाययोजना, ,आकस्मिक पाऊस आल्यास निवास व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य व्यवस्था, बाहेर पडण्यासाठीचे मार्ग, वाहतूक, पार्किंग व्यवस्था तत्काळ पूर्णत्वास नेण्याचे निर्देश मा. पालकमंत्री श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिले.
सदर येथील जिल्हा नियोजन भवन येथे सोमवारी (ता.१५)धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि कोराडी येथील नवरात्री उत्सवाच्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. यावेळी आमदार डॉ.नितीन राऊत, आमदार श्री.चरणसिंह ठाकूर, माजी मंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे, पोलीस आयुक्त डॉ.रवींद्र कुमार सिंगल, महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, सह पोलिस आयुक्त श्री.नवीनचंद्र रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.विनायक महामुनी, महानगरपालिका अतिरिक्त आयुक्त श्रीमती वसुमना पंत, अतिरिक्त आयुक्त श्रीमती वैष्णवी बी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.



