डिजिटल अरेस्टचा सापळा! नागपुरातील दोन निवृत्त बँक कर्मचाऱ्यांची 41 लाखांची फसवणूक

नागपूर | शहरात पुन्हा एकदा सायबर गुन्हेगारांनी ‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक सापळा रचत दोन निवृत्त बँक कर्मचाऱ्यांची तब्बल 41 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी नागपूर सायबर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
पहिल्या प्रकरणात, SBI बँकेतील निवृत्त महिला कर्मचारी (वय 65) यांना कॉल करून “तुमच्या बँक खात्यात मनी लॉंड्रींगचे पैसे जमा झाले आहेत, त्यामुळे तुम्हाला डिजिटल अरेस्ट करण्यात येईल,” अशी भीती दाखवण्यात आली. त्यानंतर चौकशीच्या नावाखाली विविध खात्यांमध्ये तब्बल 19 लाख रुपये जमा करण्यास भाग पाडले.
दुसऱ्या घटनेत, एका निवृत्त बँक कर्मचाऱ्याला “तुझं आधार कार्ड मुंबईला लिंक असून त्याद्वारे मनी लॉंड्रींगचे पैसे फिरवले जात आहेत. चौकशीसाठी तुझ्या खात्यातील रक्कम RBI च्या खात्यात जमा करावी लागेल, अन्यथा ईडीची कारवाई होईल,” अशी धमकी देण्यात आली. आरोपींनी विश्वास बसवून त्या कर्मचाऱ्याला तब्बल 22 लाख रुपये हस्तांतरित करायला भाग पाडले. एवढेच नव्हे, तर त्याच्या खात्यात रक्कम अपुरी असल्याने सोने तारण ठेवून लोन काढायला लावून ती रक्कमही बळकावली.
या दोन्ही घटनांमुळे शहरातील निवृत्त नागरिक आणि विशेषतः बँक कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
